नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकला सायबर गुन्हेगारांनी आपले शस्त्र बनविले आहे. त्यामुळेच जर तुमचे फेसबुक अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी हे वृत्त अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, अनेकदा अनोळखी तरुणी किंवा तरुण हे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. या अकाऊंटवरील त्यांचा बनावट फोटोच अनेकांना ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी उद्युक्त करीत असतो. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये एका तरुणाच्या बाबतीत घडला आहे.
नाशिक सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका तरुणाला त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एका अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने फारशी काळजी न घेता ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर या तरुणाला ही बाब चांगलीच महागात पडली आहे. पूनम शर्मा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन या तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट आली. या तरुणाने ती स्विकारली. त्यानंतर त्या अनोळखी तरुणीने या तरुणाशी फेसबुकवरच चॅटिंग केले. याच्या माध्यमातून तिने या तरुणाचा व्हॉटसअॅप नंबर घेतला. परिणामी, दोनच दिवसात या तरुणीने या तरुणाला थेट व्हिडिओ कॉल केला. तरुणाने हा व्हिडिओ कॉल स्विकारला. त्यानंतर त्याच्या निदर्शनास आले की, समोरील महिला ही विवस्त्र आहे. तसेच, ती अश्लिल हावभाव करीत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओही रेकॉर्ड केला जात होता. हा व्हिडिओ कॉल संपताच त्या तरुणीने थेट या तरुणाला कॉल केला आणि धमकी दिली की तातडीने गुगल पे वर पैसे पाठव. अन्यथा हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल केला जाईल तसेच, फेसबुक अकाऊंटवरील त्याच्या मित्रांना तो पाठविला जाईल. हा सर्व प्रकार सायबर क्राईमचा असल्याचे या तरुणाला लक्षात आले. त्यामुळे त्याने तातडीने सायबर पोलिस स्टेशन गाठले. यासंदर्भात या तरुणाने रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, फेसबुक किंवा अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट किंवा मेसेजला उत्तर देणे टाळावे, असे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे.