नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सव्वा कोटी रुपयाला गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने शहरातील बँक व्यवस्थापकासह तिघांची ही फसवणूक करण्यात आली आहे. अल्पावधीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवत भामट्यांनी गुंतवणुकदारांना लाखोंच्या रकमा विविध बँक खात्यात ऑनलाईन भरण्यास भाग पाडले असून, सहा महिने उलटूनही गुंतवणुकीची व परताव्याची रक्कम पदरात न पडल्याने गुंतवणुकदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बँक व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक व्यवस्थापकासह शहरातील तिघाशी भामट्यांनी गेल्या मार्च महिन्यात संपर्क साधला होता. बनावट कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये समावेश करून घेत गुंतवणुकदारांना विविध जाहिरातीच्या माध्यमातून प्रलोभन दाखविण्यात आले.
बॅक व्यवस्थापकांने भामट्यांच्या आमिषास बळी पडत बनावट ट्रेडिंग प्लॅटफार्मवर खाते ओपन करून नमुद अॅपवर विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ खरेदी करण्यासाठी सांगण्यात आलेल्या विविध बँकेच्या खात्यावर तब्बल ४४ लाख ९५ हजाराची भरल्याने ही फसवणुक झाली. भामट्यांनी बँक व्यवस्थापकाचा उत्साह बघता प्रारंभी ५ लाख ४८ हजार ५०० रूपयांचा परतावा देत विश्वास संपादन करीत ही फसवणुक केली. याच प्रमाणे अन्य तीघांची सुमारे ९३ लाख ३४ हजार ३७९ रूपयांची फसवणुक केली. या प्रकरणात चौघांना तब्बल १ कोटी ३२ लाख ८० हजार ८७९ रूपयांना गंडविण्यात आले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.