नाशिक – नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमधून तब्बल लाखो रुपयांच्या नोटा गायब झाल्याची खळबळजनक वार्ता आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या या प्रेस मधून नोटा गायब कशा झाल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रेसमधील ५ लाख रुपयांच्या नोटांचा हिशोब लागत नसल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही किंवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालेला नाही. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था प्रेसमध्ये असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० रुपयांचे १० बंड गायब आहेत. प्रेस व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली असून या नोटांची शोधाशोध सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अन्य बाबी पडताळून पाहिले जात असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी प्रेस व्यवस्थापनासह अन्य कुणीही काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतरच अधिक बाबी स्पष्ट होणार आहेत.