नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यावसायीक प्रलोभनातून एकास भामट्याने नऊ लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. चायनिज इलेक्ट्रीक मालाच्या खरेदीसाठी दिलेल्या रकमेचा भामट्याने अपहार केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिश शशीधर डोईजोडे (रा.लिलावती हॉस्पिटलजवळ, विद्यानगर मखमलाबादरोड) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत प्रमोद भिमराव चौधरी (रा.लोकधारा सोसा.जवळ कोणार्कनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व संशयित एकमेकांचे परिचीत असून सन २०२३ मध्ये संशयिताने चौधरी यांना चायनिज इलेक्ट्रीक वस्तू विक्रीतून मोठा नफा मिळविण्याची संधी असल्याची बतावणी करीत व्यवसायाचे प्रलोभन दाखविले होते. संशयिताने विश्वास संपादन केल्याने चौधरी यांनी व्यवसायासाठी तयारी दर्शविली.
यावेळी चीन मधून इलेक्ट्रीक वस्तू भारतात मागविण्यासाठी चौधरी यांनी डोईजोडे यास ८ लाख ९७ हजार ५०२ रूपयांची रक्कम ऑनलाईन अदा केल्याने ही फसवणुक झाली. भामट्याने आजतगायत चौधरी यांना मालाचा पुरवठा केला नाही. तसेच सदर रक्कम स्व:ताचे फायद्यासाठी वापरल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
……….