नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरटयांनी चोरून नेल्या याबाबत आडगाव,अंबड व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबडलिंकरोड भागात राहणारे तुषार मुकूंदा लोंढे ( रा. माणिकनगर) हे रविवारी (दि.१५) रामलिला लॉन्स भागात गेले होते. नांदूर जत्रा लिंकरोडवरील गिरीश इंटरप्रायझेस या दुकानासमोर पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच १५ डीझेड ८९३५) चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.
दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात घडली. याबाबत अंकुश राजेंद्र चिखले (रा.लाखलगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. चिखले गेल्या रविवारी (दि. ८) शहरात आले होते. सकाळच्या सुमारास ते ठक्कर बाजार बसस्थानक आवारात गेले असता ही घटना घडली. प्लॅट फार्म १० शेजारी लावलेली त्यांची एमएच १५ जीई ५६९९ मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील संभाजी स्टेडिअम भागात घडली. समाधान मधुकर चव्हाण (रा.श्रीकृष्णनगर,अंबड) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण गेल्या शनिवारी (दि.१४) सिडकोतील संभाजी स्टेडिअम भागात गेले होते. परिसरात पार्क केलेली त्यांची एमएच १५ एफबी ३२१५ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.