पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामगाराने फाटकी नोट घेण्यास विरोध केल्याने एका तलवारधारीने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात घाव घातल्याची घटना नाशिक पुणा मार्गावरील बोधलेनगर येथे घडली.
दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केलेले असल्याने तो बालंबाल बचावला असून या घटनेत संशयिताने धारदार तलवारीचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर दहशत माजविली होती.
पोलीसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन लक्ष्मण सोमवंशी (रा. साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सुनिल एकनाथ पगारे (३३ रा. पगारे मळा, गांधीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पगारे रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास एमएच १७ सीझेड ३३५४ या दुचाकीस पेट्रोल भरण्यासाठी नाशिक पुणा मार्गावरील बोधलेनगर येथील धात्रक पेट्रोल पंपावर गेले असता ही घटना घडली. पंपावर पुढे उभ्या असलेल्या संशयिताने शंभर रूपयांचे पेट्रोल आपल्या वाहनात भरले. यावेळी फाटकी नोट कामगारास दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता.
फाटकी नोट घेण्यास कामगाराने नकार दिल्याने संतप्त संशयिताने दुचाकीस लावलेली धारदार तलवार काढून पाठी मागे उभे असलेल्या पगारे यांच्या डोक्यात वार केला. पगारे यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले असल्याने ते बालंबाल बचावले असून यानंतर संशयिताने आरडाओरड करीत तलवार फिरवत परिसरात दहशत माजविली.
या घटनेने पंपावरील ग्राहकही जीव वाचवित पळून गेले असून या घटनेची माहिती तात्काळ पोलीसांना कळविण्यात आल्याने त्यास तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक समद बेग करीत आहेत.
चौथ्या मजल्यावरून पडल्याने मजूराचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काम करीत असतांना चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षी परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना पेठरोडवरील आरटीओ कार्यालय परिसरात घडली.
बांधकाम व्यावसायीकाने कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थाबाबत हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश रामजास सिंह (२५ मुळ रा मध्यप्रदेश) असे मृत मजूराचे नाव आहे. मुकेश सिह आरटीओ आॅफिस शेजारील आदिवासी कॉलनी मध्ये उमयाजी आर.एस.सी या बांधकाम व्यावसायीकाच्या नव्याने सुरू असलेल्या साईटवर वास्तव्यास होता.
रविवारी (दि.९) दुपारच्या सुमारास तो चौथ्या मजल्यावर काम करीत असतांना जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने साईड सुपरवायझर कृष्मा ठोंबरे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार किरण सानप करीत आहेत.








