नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे महामार्गावरील बोधले नगर येथे शनिवारी भर रस्त्यात चॅापरने वार करुन तरुणांचा खून करणा-या चार संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तुषार एकनाथ चावरे (वय १९) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मैत्रिणी वरून हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी या घटनेत दुचाकीवरुन पाठलाग करुन ३ जणांनी एका तरुणावर चॅापरने वार केले. त्यात हा तरुण जागीच ठार झाला. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने काही तासात या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
पूर्व वैमनस्यातून ओळखीतील व्यक्तींनीच तुषारची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र ही घटना मैत्रीणीवरुन झाल्याचे समोर आले आहे. तुषार हा एका दुकानात कामाला होता. तो आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन जात होते. त्याचवेळी ट्रीपलसीट आलेल्या तीन जणांनी त्याच्यावर हल्ला केला. अगोदर या हल्लेखोरांनी तुषारच्या दुचाकीला लाथ मारली. त्यानंतर हा हल्ला केला. यावेळी तुषारच्या मित्राने तेथून पळ काढला. त्यामुळे तो वाचला.
भर रस्त्यावर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्यात हा भर रस्त्यावर हल्ला करण्यात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा प्रकार कळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हल्लेखोर पळून गेल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली टीम रवाना केल्या.
उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांच्या पथकातील विनोद लखन जयंत शिंदे यांनी शिताफिने तपास करून पोलीस हवालदार सुरज गवळी, पंकज कर्पे, पी एन गुंड, गौरव गवळी, अनिल शिंदे, राहुल जगताप यांची मदत घेत हल्लेखोर सुलतान मुक्तार शेख, रोहित मनोज पगारे, शुभम संजय खांदरे, अमन शेख या युवकांना ताब्यात घेतले.