नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात सणासुदीतही गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. दोन दिवसांपूर्वी गरबावरुन झालेल्या वादात युवकावर टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आता उपनगर परिसरात एका टोळक्याने युवकावर चाकू हल्ला केला. त्यात गंभीर झालेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन नवरात्रीत शहरात युवकाची हत्या करण्यात आल्याने उपनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नवरात्री उपनगर परिसरातील शिवाजी नगर भागात नवरात्र मंडळाच्या ठिकाणी गरबा सुरू होता. त्याचवेळी काही युवकांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर एका टोळक्याने एका युवकावर चाकू हल्ला केला. यात तो युवक गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत हा युवक जवळच असलेल्या मुक्ताई हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर येऊन कोसळला. त्याठिकाणाहून हल्लेखोर पसार झाले. जखमी युवकास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव बबलू लोट असे आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. पुढील कारवाई उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर करीत आहे.
Nashik Crime Youth Murder Dandiya Program