नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कालिका मंदिराच्या मागील बाजूस राहणाऱ्या तरुणाच्या हत्येप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. अक्षय अनिल मोरे (वय 24, रा सहवास नगर) आणि सिध्दार्थ अनिल मोरे (वय 22 रा. सहवास नगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सुरेखा पाटील (रा.विधाते मळा) यांनी तक्रार दाखल केली होती.
मृत तरुणाचे नाव सचिन विजय पाटील (वय ३६) असे आहे. सचिन हा जुन्या आग्रा रोडवरील कालिका मंदिराच्या मागील बाजूस राहतो. जुन्या भांडणाच्या कुरापतीवरुन काही अज्ञात इसमांनी सचिन याला त्याच्या राहत्या घराजवळ शनिवारी बेदम मारहाण केली. छाती, पोट आणि डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याने त्याची प्रकृती खालावली. पत्नी सुरेखा पाटील यांनी तातडीने सचिन याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान सचिन याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.