सिडकोत घरमालकाच्या भावाने केला महिलेचा विनयभंग
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरमालकाच्या भावाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना सिडकोत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार महिला आपल्या मुलीस घेण्यासाठी आई वडिलांच्या घरी गेली असता ही घटना घडली. महिलेचे आई वडिल सिडकोत भाडेतत्वावर राहतात. महिला आपल्या माहेरी गेली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे तिने घरात प्रवेश केला असता घरमालकाच्या भावाने तिला शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
तिडके कॉलनीत अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितल्याने एकाने अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. या घटनेत मुलगा जखमी झाला असून हल्लेखोरास पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश नामदेव झाल्टे (४० रा.मिलींदनगर,तिडके कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री शिरसाठ यांनी तक्रार दाखल केली आहे. शिरसाठ यांचा मुलगा सौरभ लक्ष्मण शिरसाठ (१७ रा.मिलींदनगर) हा या घटनेत जखमी झाला असून सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास तो तिडके कॉलनीतील आरबीएल बँकेसमोरून पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्यात उभ्या असलेल्या संशयितास त्याने बाजूला होण्यास सांगितले असता त्याने कुठलेही कारण नसताना खिशातील धारदार वस्तू काढून सौरभच्या गालावर वार केला. या घटनेत सौरभ जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक बहिरम करीत आहेत.