नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात महिलांच्या कौटुंबिक छळाचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाभा नगर परिसरातील विवाहितेचा छळ होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. नणंदेच्या लग्नासाठी वडिलांकडून दहा लाख रुपये आणत नसल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता 19 जानेवारी 2019 ते 18 नोव्हेंबर 2020 दरम्यान डॉ. भाभानगर येथे नांदत होती. या दरम्यान, पती चेतन मोटकरी (वय 30), सासरे वाल्मीक गोटराम मोटकरी, सासू व नणंद यांनी विवाहितेचा छळ केला. मोटकरी कुटुंबियांनी संगनमत केले होते. “तुझ्या बापाकडून दहा लाख रुपये घेऊन ये,” अशी मागणी केली, तसेच “माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे. आम्हाला पण आमच्या मुलीला हुंडा द्यायचा आहे,” असे बोलून विवाहितेचा छळ केला. तसेच सासूने विवाहितेच्या अंगावरील मंगळसूत्र, बांगड्या, हार, अंगठी असे एकूण 8 तोळे सोने काढून घेतले. घरगुती कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करून व धमकावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध भा. दं. वि. कलम 498 (अ), 323, 504, 506, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गेंगजे करीत आहे.