मंगळसूत्र ओरबाडून नेले
नाशिक – रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांपैकी एकीच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील कालिका पार्क भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता भगवान अहिरे (५४ रा.कर्मयोगीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
कालिका पार्क भागात अहिरे या सोमवारी (दि.२५) गेल्या होत्या. रात्री व्याहीणबाईंसमवेत त्या आठवण बंगल्या समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. दोन्ही महिला रस्त्याने पायी जात असतांना समोरून मोबाईलवर बोलत एक तरूण आला. त्याने अहिरे यांच्या गळ्यातील सुमारे ७२ हजाराचे मंगळसूत्र हिसकावले. तसेच, काही अंतरावरच उभ्या असलेल्या डबलसिट दुचाकीस्वारांसमवेत परिसरातील मनपसंत स्विटच्या दिशेने चोरट्यांनी पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
बस प्रवासात दागिन्यांची चोरी
नाशिक – बस प्रवासात महिलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना द्वारका चौफुली भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशिला गोरख कुंभार (रा.पांडेसरा जि.सुरत) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुंभार या रविवारी (दि.२४) शहरात आल्या होत्या. सुरत येथून त्यांनी उधना (गुजरात) आगाराच्या सुरत शिर्डी या बसमधून प्रवास केला. सुरत ते द्वारका चौफुली दरम्यानच्या प्रवासात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बसमधील कॅरीवर ठेवलेल्या बॅग उघडून पर्स मधील सुमारे ३८ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यास मंगळसुत्र आणि अंगठ्यांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस नाईक बहिरम करीत आहेत.