घरात दिवा लावत असताना गाऊनने घेतला पेट; पंचवटीतील महिलेचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवघरात दिवा लावत असतांना गाऊनने पेट घेतल्याने भाजलेल्या ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना क्रांतीनगर भागात घडली होती. सदर महिलेवर मुंबई येथे उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वीणा अरूण क्षिरसागर (रा.लक्ष्मीनारायण निवास,गणेशचौक क्रांतीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. क्षिरसागर या गेल्या ३१ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या घरातील देवघरात दिवाबत्ती करीत असतांना ही घटना घडली होती. पेटत्या दिव्यात तेल टाकत असतांना परिधान केलेल्या गाऊनने पेट घेतला होता. या घटनेत त्या गंभीर भाजल्याने नाशिक शहरातील आणि औरंगाबाद येथील वेगवेगळ्या रूग्णालयात त्यांनी सहा सात महिने उपचार घेतला. पती अरूण क्षिरसागर यांनी अधिक उपचारार्थ मुंबई येथील जेजे रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
अंबड एमआयडीसीत सव्वा दोन लाखांच्या जाळ्या लांबवल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याच्या कंपाऊंडवरील लोखंडी जाळी तोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात तांबे या धातूचे सिल्वर प्लेटींग करण्यासाठी आलेल्या जॉबचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र नरेश पवार (रा.तारवालानगर,दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार अंबड औद्योगीक वसाहतीतील क्रिष्णा उद्योग कारखान्याचे कामकाज बघतात. गेल्या सोमवारी (दि.२) रात्री कारखाना बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी कंपाऊड वरील लोखंडी जाळी तोडून कंपनीत प्रवेश करून सुमारे २ लाख ३६ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात तांबे या धातूचे सिल्वर प्लेटींग करण्यासाठी आलेल्या जॉबचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.