नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या काही तासात उपनगर गुन्हे शोध पथकांनी चारचाकी गाड्यांची तोडफोड करणा-या चार संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर भर पावसात रात्री त्यांची धिंड काढली. सोमवारी मध्यरात्री नाशिकरोडला धोंगडे मळा येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालय समोर बंगल्याबाहेर लावलेल्या चार चारचाकी कार तलवार व कोयत्याने फोडल्या त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या संशयितानाता ताब्यात घेतले आहे. त्यानंतर ही नाशिकरोडवर धिंड काढली.
सिडको येथे वाहनांची तोडफोड त्यानंतर रविवारी विहितगाव येथे वाहनांची जाळपोळच्या घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये संताप होता. पण, पोलिसांनी या संशयितांना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. दारणा नदी किना-यावर हे संशयित लपून बसलेले होते. पोलिसांनी शुभम हरवीर बेनवाल उर्फ बाशी, रोशन उर्फ नेम्या रामदास पवार, मोइज् जावेद शेख व भैय्या उर्फ सत्यम देवल यांना ताब्यात घेतले. स्थानिक नागरिकांनी या संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत केली. उपनगर पोलिसातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, पी एन गुंड, जयंत शिंदे, सुरज गवळी, राहुल जगताप, गौरव गवळी, अनिल शिंदे यांनी या आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चांगली अद्दल घडवत धिंड काढली.
शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. सिडकोमध्ये वाहनांची तोडफोड झाली. काल (२४ जुलै) विहितगावमध्येही गुंडांनी हैदोस घातला. आणि आज पुन्हा नाशिकरोमध्येही असाच प्रकार घडला आहे. मुक्तीधामच्या पाठीमागे वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. कोयता आणि तलवारीने वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. अशा प्रकारे दहशत माजविणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
१२ जुलैला सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी रात्री विहितगाव येथे सोसायटीच्या आवारातील पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण असतांना नाशिकरोड येथे ही घटना घडली. या प्रकाराला त्वरीत आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहनांची ही तोडफोड टवाळखोरांकडून दहशत माजवण्यासाठी केली जात आहे. या सर्व घटनेमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नाशकात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थितीत केला आहे.
विहितगावमध्ये पाच ते सहा वाहनांची जाळपोळ
विहितगावमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी जाळल्याची घटना घडली. मथुरा चौक येथील रामकृष्ण हरी प्राईड सोसायटीत दोघा गुंडांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी जाळल्या. त्याचप्रमाणे एक टेम्पोची काच फोडून रस्त्याने जाणार्या इतर वाहनांवर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत या गुंडांननी अगोदर महागड्या दुचाकीवर पेट्रोल ओतून हे कृत्य केले. त्यानंतर हातात कोयते घेत जवळच असलेल्या मालवाहू टेम्पोवर हल्ला चढवून काचा फोडल्या. त्यानंतर इतर वाहनांवर कोयत्याने हल्ला केला.