नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुप्पट किंवा तिप्पट पैसे करण्याच्या बहाण्याने फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असले तरी आमिषापोटी अनेक जण सातत्याने बळी पडत आहेत. आताही असाच प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या एका महिलेने तिच्या साथीदारासह औरंगाबादच्या व्यक्तीची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी महिलेसह तिच्या साथीरादारा अटक केली आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे राहणाऱ्या मोईद फिदाअली सैफी यांची ७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नाशिकमधील एका महिलेने त्यांना तिप्पट पैसे करण्याचे आमिष दाखविले. ७ लाखांच्या बदल्यात २३ लाख रुपये मिळतील. त्यासाठी सदर महिलेला एक लाख रुपयांचे कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले. या आमिषाला भुलल्याने सैफी हे ७ लाख रुपये घेऊन नाशिकला आले. त्यांना पंचवटीतील अमरधामरोडवरील हॉटेल चटक मटक येथे बोलविण्यात आले. याठिकाणी महिलेसह तिच्या साथीदारांनी हे ७ लाख रुपये घेऊन तवेरा गाडीतून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सैफी यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने या सर्व प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणातील आरोपी महिलेसह तिचा साथीदार शिवाजी राघू शिंदे यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पंचवटी पोलिस करीत असून फरारी आरोपींचाही शोध सुरू आहे.