नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तलाठी पेपर हायटेक कॉपी प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गणेश गुसिंगे याला अटक केली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतच अनेक बाबींचा उलगडा झाला आहे.
शहरातील दिंडोरी रोडवरील वेबईझी इन्फोटेक याठिकाणी गुरूवार (दि. १७) रोजी तलाठी भरतीसाठी ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत परीक्षा केंद्राबाहेरून संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (वय-२८, रा. मुक्काम सूजारपूरवाडी पोस्ट परसोडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यास ताब्यात घेतले होते…
यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता नाशिक पोलीस आयुक्तांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून रवाना केले आहे. या पथकात एसीपी, चार वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण १० जणांचा समावेश आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा गुरुवार (दि. १७) पासून सुरू झाली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या ठिकाणी तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा सुरू असतांना परीक्षा केंद्राबाहेरून संशयित गणेश गुसिंगे याला एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि श्रवणयंत्र असे साहित्य वावरतांना ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील काही प्रश्नांचे फोटो देखील मिळून आले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर संशयित गणेश गुसिंगे यास शुक्रवार (ता.१८) रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच यानंतर आता पोलीस आयुक्तांनी या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून हे पथक संशयित गणेश गुसिंगे यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील गावी जाऊन तपास करण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी कोण कोण साथीदार आहेत? हे रॅकेट कार्यरत आहे का? आधुनिक साहित्य वापरत हायटेक कॉपीचे प्रशिक्षण दिले जाते का? यासह आणखी काही गोष्टींचा या पथकाकडून तपास केला जाऊ शकतो
दरम्यान, संशयित गणेश गुसिंगे याने २०१९ मधील म्हाडा भरती आणि २०२१ च्या पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा पेपर फोडल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी त्याच्यावर २०२१ साली गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी फरार असलेल्या या आरोपीला दोन वर्षे अटक का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
Nashik Crime Talathi Paper High tech Copy Case Investigation