सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील पिंपळसोंड जंगलात खैर लाकडाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचारी यांनी सापळा रचून गाडी ताब्यात घेतली. यावेळी अंधाराचा फायदा घेत तस्कर तसेच चालक चावी गाडीतच सोडून पसार झाले. या वाहनावर कोणत्याही प्रकारचे नंबर आढळून आले नाहीत.
पिंपळसोंड जंगलातील दगडपाडा या गुजरात सीमावर्ती जंगलात खैर लाकडाची एक पिक अप गाडीत खैराची लाकडे भरलेली असून ते चिंचमाळ, बर्डा, वांगण, करंजुल, मांधा या मार्गे जाणार असल्याचे समजल्यावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये खैर लाकडाचे सहा ते सात नग असून एक घनमीटर लाकुड जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २३ हजार रुपये आहे. तर गाडीची किंमत अंदाजे एक ते सव्वा लाख रुपये आहे. उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली असून सर्वच वाहने वणी येथील वनविभागात जमा करण्यात आली आहेत. या कामी वनरक्षक हिरामण थविल, आनंदा चौधरी, उमाजी पवार, वामन पवार, वन परिमंडळ अधिकारी द्रौपदा चौधरी, अविनाश छगने वन मजूर हरिचंद्र चौधरी, उखाराम चौधरी, छगन बागुल, रावजी चौधरी आदींनी यशस्वी कामगिरी केली.
आडगाव शिवारात तरुणाची आत्महत्या
नाशिक शहरालगत असलेल्या आडगाव शिवारात पडक्या घरात अज्ञात तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याने त्याचे आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आडगाव शिवारातील धुमाळ चाळ परिसरातील पडक्या खोलीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीने गळफास लावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१८) उघडकीस आला.
सदर व्यक्तीने अज्ञात कारणातून पडक्या घरातील लाकडी दांडक्यास साडीच्या काठाने गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत जितेंद्र कुमार श्रीरामलाल गौतम यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक देसाई करीत आहेत.