नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आनंदवली शिवारात फार्मसीच्या विद्यार्थ्याची हत्या कशामुळे झाली हे पोलिसांनी शोधून काढले आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. हत्या झालेला विपुल हा त्याच्या मित्राच्या वडिलांना चुगली लावत असे, या कारणावरुन त्याची हत्या करण्यात आली आहे.
गंगापूररोडवरील आनंदवली शिवारात असलेल्या बेंडकुळे नगरमध्ये विपुल खैर या युवकाचा मृतदेह सापडला होता. विपुल हा नाशिक शहरातील शुभम पार्क येथील रहिवासी आहे. पण, तो सध्या अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत होता. बेंडकुळे नगर परिसरात काही नागरीक सकाळच्या सुमारास फिरत असताना त्यांना दुचाकी व एक बॅग पडलेली दिसली. थोड्या अंतरावर पाहिले असता निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृतदेहावर खरचटल्याच्या खुना मिळून आल्या. पोलिसांनी संबंधित युवकाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. विपुल हा अभोणा येथे गेला होता. आनंदवली शिवारात तो कसा आला, असा प्रश्न विपुलच्या कुटुंबियांनी उपस्थित केला. विपुलचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या खुनाबाबत पोलिस आयुक्त म्हणाले की, प्रथमेश उर्फ विपुल रतन खैर (रा. शुभम पार्क, सिडको) याचा मृतदेह बेंडकुळे मळा, गोदावरी नदीकाठ, आनंदवल्ली येथे आढळून आला होता. याप्रकरणी सुरवातीला गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर सदर प्रकार हा खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला. अवघ्या काही तासातच या खून प्रकरणातील संशयितांची ओळख पटविण्यात आली. यातील एका संशयिताला आम्ही अटक केली आहे. तर या खुन प्रकरणातील दोन संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या खुनाचे प्राथमिक कारण हे वडिलांना चुगली लावत असल्याचे संशयितांनी सांगितले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.