नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर हे गुन्ह्यांची घटनांनी हादरले आहे. आज पहाटेच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवर खुनाची घटना घडलेली असताना आता आनंदवलीत आणखी एक हत्येचा प्रकार समोर आला आहे. अभोण्याचा रहिवासी असलेल्या फार्मलीच्या विद्यार्थ्याची गंगापूररोडवरील आनंदवली शिवारात खुन करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात हत्येची ही चौथी घटना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गंगापूर रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूररोडवरील आनंदवली शिवारात असलेल्या बेंडकुळे नगरमध्ये एका युवकाचा मृतदेह सापडला आहे. मृत युवकाचे नाव विपुल खैर असे आहे. विपुल हा अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. विपुल हा डिजीपी नगर येथील रहिवासी आहे. पण, तो सध्या अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत होता.
बेंडकुळे नगर परिसरात काही नागरीक सकाळच्या सुमारास फिरत असताना त्यांना दुचाकी व एक बॅग पडलेली दिसली. थोड्या अंतरावर पाहिले असता निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, मृतदेहाच्या अंगावर खरचटल्याच्या खुना मिळून आल्या आहेत. पोलिसांनी संबंधित युवकाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. विपुल हा अभोणा येथे गेला होता. आनंदवली शिवारात तो कसा आला, असा प्रश्न विपुलच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. विपुलचा खून झाल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.