नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विंचूर गवळी येथे जमिनीच्या वादातून मुलाने आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने वृध्द पिता जखमी झाले असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश निवृत्ती वाघचौरे असे आपल्या पित्यास मारहाण करणा-या संशयित पुत्राचे नाव आहे. याप्रकरणी निवृत्ती लक्ष्मण वाघचौरे (७८ रा. विंचुर गवळी ताजि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. निवृत्ती वाघचौरे हे रविवारी (दि.२) रात्री आपल्या घरात झोपलेले असतांना ही घटना घडली. वृध्द वाघचौरे झोपलेले असतांना संतप्त मुलगा योगेश याने शिवीगाळ करीत त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्यात ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.
वृध्देच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वारांनी ओरबाडली
महात्मानगर भागात रस्त्याने पायी जाणा-या ८१ वर्षीय वृध्देच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा वसंत सहस्त्रबुध्दे (रा.भाग्यवंती सोसा.जयपूर हाऊस जवळ,पारिजातनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सहस्त्रबुध्दे या मंगळवारी (दि.४) फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील पोहूमल ज्वेलर्स जवळून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.