नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील दुकाने चोरट्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळेच दररोज विविध भागातील दुकानांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. आताही शहरात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
बंद दुकान फोडले
बंद दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे १४ हजाराचा ऐवज लंपास केला. मखमलाबाद रोडवरील फडोळ मळ्यातील झालेल्या या घटनेत चोरट्यांनी एलईडी टिव्हीसह कॅडबरीच्या बॉक्स लंपास केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनीत अशोकराव कुटे (रा.आदर्श नगर, रामवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुटे यांचे मखमलाबाद रोडवरील फडोळ मळा भागात दुकान आहे. बुधवारी (दि.२६) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचा पत्रा उचकटून एलईडी टिव्ही आणि कॅटबरीचा बॉक्स असा सुमारे १४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
दुकानाच्या काऊंटरवरुन मोबाईल लांबवला
रथचक्र चौक परिसरात दुकानातील काऊंटरवर ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता अमित पाटील (रा.गणेश सप्तशृंगी सोसा.रथचक्र चौक इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पाटील यांचे आपल्या राहत्या इमारतीतील तळ मजल्यावर द उमन्स वर्ल्ड नावाचे दुकान आहे. या दुकानात ही घटना घडली. पाटील आपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानातील काऊंटरवर ठेवलेला त्यांचा सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
Nashik Crime Shop Theft Police FIR