नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या वादातून तिघांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ घडली. या हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून दिले. त्यानंतर त्यांनी कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढल्याचे वृत्त आहे.
रविवारी दुपारी ही घटना घडली. आपल्या चारचाकी गाडीतून तपन जाधव प्रवास करत असताना आशिष जाधव याने आपल्या गाडीची धडक देत दोन साथीदारांसह हा हल्ला केला. या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हेशाखा, सातपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अशी पळवली दुचाकी
गाडीने धडक दिल्यामुळे हल्लेखोरांची गाडी बंद पडली. त्यामुळे त्यांनी एका कामगारांना थांबवत त्याला धाक धाकवत त्याची दुचाकी ताब्यात घेतली. या गाडीनेच हे हल्लेखोर पळाले.
Nashik Crime Satpur Firing on Youth one Injured