सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोकनगर येथील मिठाईचे दुकान सुरळीत चालू ठेवण्यासाठी दर महिन्याला दहा हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या ३८ वर्षीय तरुणा विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेला तरुण फरार असून सातपूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुखराज चौधरी यांचे अशोकनगर येथे अंबिका स्वीट्स नावाने मिठाईचे दुकान आहे. याच परिसरात राहणारा कमलेश उर्फ कमलाकर ह्याळीज (वय ३८, रा. अशोकनगर) हा दिनांक २१ जुनला रात्री साडे नऊ वाजता व २२ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता विनापरवानगी मिठाई दुकानात गेला होता. यावेळी ह्याळीज याने मिठाईच्या दुकानात खाद्य पदार्थ खरेदी करत पैसे देण्यास नकार दिला. दुकानातील कर्मचाऱ्यांनी ह्याळीज याच्याकडे पैशाची मागणी करताच ह्याळीज याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.
यावेळी दुकानाचे मालक पुखराज चौधरी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र कमलाकर ह्याळीज याने “तुम्हाला दुकान सुरू ठेवायचे असेल तर दर महिन्याला मला दहा हजार रुपयाची खंडणी द्यावी लागेल” असा दम भरत शिवीगाळ केली. घाबरलेल्या अवस्थेत पुखराज चौधरी यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठले. चौधरी यांच्या तक्रारीवरून कमलाकर ह्याळीज याच्याविरुद्ध सातपूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच कमलाकर ह्याळीज याने परिसरातून पळ काढला असून सातपूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे यावे
कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी शासनाने आमची नियुक्ती केली आहे. परिसरात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी कुठल्याच प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अशाप्रकारे दमदाटी करणाऱ्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. वेळीच मुस्क्या आवळू.
पंकज भालेराव, व.पो.निरीक्षक