नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यात सक्रीय असलेल्या डेव्हीड गँगच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदारास मुंबईतील विक्रोळी भागात अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने ही कामगिरी केली आहे. दोन खूनांच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या या टोळीचा पोलिस अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. कुख्यात गुन्हेगार जॉन पॅट्रिक मॅनवेल उर्फ छोटा पापा (वय २२) आणि अजय पॅट्रिक मॅनवेल उर्फ आज्या (२७, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरीत डिसेंबर २०२० मध्ये संजय बबन धामणे (रा. देवळालीगाव, नाशिकरोड) याचा धारदार शस्त्राने वार करीत निघृण खून करण्यात आला होता. त्यानंतर ऑगष्ट २०२२ मध्ये याच गँगच्या सदस्यांनी झाकीया मेहमुद शेख (रा.गायकवाडनगर, इगतपुरी) या महिलेचाही निघृण खून केला. या गँगचा इगतपुरीसह रेल्वे स्टेशन भागातील वाढती दहशत लक्षात घेवून पोलिसांनी डेव्हीड गँगच्या सदस्यांविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे.
या कारवाई दरम्यान आशा पॅट्रिक मॅकवेल व सोनू उर्फ संजय मोहन राऊत (२३) या सदस्यांना रेल्वे स्थानक परिसरात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेपासून फरार असलेल्या डेव्हिड गँगच्या सदस्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत. त्यानुसार इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे व सहायक निरीक्षक विकास ढोकरे यांचे पथक संशयितांच्या मागावर होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद व कर्नाटकात लपल्यानंतर संशयित विक्रोळीत पोहोचले. दोन महिन्यांपासून छोटा पापा आणि आज्या हे विक्रोळीत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुंबईत तळ ठोकलेल्या पथकाने गणेश चाळ येथील हरियाली व्हिलेजजवळ सापळा रचला असता दोघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. संबधितावर इगतपुरीसह कल्याण व इगतपुरी रेल्वे पोलिस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी लुटमार, चोरी अशी गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक विकास ढोकरे,अंमलदार दीपक आहिरे, किशोर खराटे, गोरक्षनाथ संतवस्तरकर, गिरीश बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सचिन देसले, मुकेश महिरे, अभिजित पोटिंदे आदींच्या पथकाने केली. या पथकाला अधिक्षकांनी वीस हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
nashik Crime Rural Police Arrest Gang Leader