पंचवटीत ४ लाखांचे दागिने लांबविले
नाशिक – सराफी दुकान फोडून चोरट्यांनी भरदिवसा सुमारे चार लाख रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. ही घटना पेठरोडवरील बच्छाव हॉस्पिटल भागात घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव बबनराव भोसले (रा.ओमकार दर्शन,मेहरधाम) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भोसले यांचे बच्छाव हॉस्पिटल भागात प्रशिध्दी ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. रविवारी (दि.८) सायंकाळच्या ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. व काऊंटरला लावलेले सुमारे ४ लाख ५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एस.जी.डंबाळे करीत आहेत.
सातपूरला वाहनाच्या धडकेत तरुण ठार
नाशिक – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रस्त्याने पायी जाणारा २३ वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील महापालिका कार्यालयासमोर झाला. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दशरथ निवृत्ती चौधरी (मुळ रा.चडकवाडी जि.पालघर हल्ली दाणी मळा सातपुर) असे मृत तरूणाचे नाव आहे. चौधरी रविवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. महापालिका कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीजवळून तो पायी जात असतांना भरधाव अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरीकांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.