नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात चार विविध प्रकारचे गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात रस्ते अपघातात वृद्ध ठार, मोबाईल आणि लॅपटॉप चोरी तसेच तिघांकडून एकाला बेदम मारहाण या गुन्ह्यांचा समावेश आहे.
म्हसरुळला कारच्या धडकेत वृद्ध ठार
म्हसरुळ शिवारात साई बाबा मंदीराकडे जाणाऱ्या मानस बंगल्यासमोर चार चाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अनिल बाळकृष्ण भालेराव (वय ६१, मोहिनीराज बंगला, दिंडोरी रोड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शुभम अनिल भालेराव याच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि ६) रात्री साडे दहाच्या सुमारास मृत अनिल भालेराव आणि त्यांचे मित्र नानासाहेब कचरु रुकारे, प्रकाश कारभारी सुर्यवंशी असे तिघे हे म्हसरुळ गावाकडून साईबाबा मंदीराकडे पायी जात होते. त्याचवेळी मानस बंगल्यासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने भालेराव यांचा मृत्यू झाला तर नानासाहेब रुकरे गंभीर जखमी आहे.
मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
भद्रकालीत नानावली दर्गा परिसरात मोबाईल चोरीच्या प्रयत्नात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सोहेल उर्फ चुन्या समीर शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी (दि ६) रात्रीतून कधी तरी संशयित सोहेल याने नानावली भागातील आरीफअली अब्दुल हई अन्सारी (वय ४८) यांच्या घराचे चॅनल गेट उघडून आतील दरवाजा उघडून घरात प्रवेश करीत त्यांचा मोबाईल चोरुचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगापूररोडला लॅपटॉप लांबवला
गंगापूर रोडला विद्या विकास सर्कल परिसरात हरी कृपा अपार्टमेंट मध्ये चोरट्यांनी घरात घुसुन लॅपटॉप लांबविला. याप्ररणी आसावरी शशीकांत वाघ (वय २३, ) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २८ ते ३० एप्रिल दरम्यान केव्हातरी चोरट्यांनी घरात घुसुन आसावरी वाघ यांचा एच प्रो बुक कंपनीचा लॅपटॉप चोरुन नेला.
तिघांकडून एकाला बेदम मारहाण
बुलेटला चारचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन तिघांनी एकाला बेदम मारहाण केली. सर्वेश योगेश कुलथे (न. १९, शिवाजी चौक सिडको) याच्या तक्रारीवरुन मारुती ओमनी (एमएच १५ एएस १६९५) मधील तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि.६) दहाच्या सुमारास सिटी सेंटर सिग्नल जवळील संभाजी चौकात दल्लुभाई पटेल कॉलनीतून सर्वेश त्याच्या बुलेटहून जात होता. त्याचवेळी त्याला ओमनीचा कट लागला. त्याचा जाब विचारला असता ओमनीतील तिघांनी त्याला मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.