नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गुन्हेगारी बोकाळल्याचे स्पष्ट होत आहे. चोरी, लूटमार, छेडछाड या घटना नित्याचाच झाल्या आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसात शहरामध्ये दुसरा खुन झाला आहे. अगदी किरकोळ कारणातून हत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. आताही केवळ दुचाकीमध्ये हवा भरुन दिली नाही म्हणून थेट पंक्चर दुकानदारालाच संपवण्यात आलं आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन जेजूरकर माळ रस्त्यावर ही हत्या झाली आहे. वाहनात हवा भरून दिली नाही या कारणावरून पंक्चर दुकानदाराची हत्या करण्यात आली आहे. दुकानावरवर हल्ला करून चालकाला ठार करण्यात आले आहे. शहरात गेल्या तीन दिवसात खूनाची ही दुसरी घटना आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहत असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे या गुन्हेगारीवर अंकुश लावतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी पंक्चर दुकानदारावर हल्ला केला. त्याच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. गुलाम रब्बानी असे मृत पंक्चर दुकानदाराचे नाव आहे. तो मूळ बिहारचा रहिवासी आहे. या घटनेनंतर संशयित फरार झाले होते. मात्र त्यातील संशयतांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून रात्री उशिरा ताब्यात घेतले. यश पवार, दादा डोंगरे, ओम चोपडेकर अशी या तिघा संशयितांची नावे आहेत.’
हॉटेल मिरची ते टाकळीरोडकडे जाणाऱ्या जेजूरकर लॉन्स ते रिंगरोडवर असलेल्या साई मोटार गॅरेजमध्ये ही हत्या झाली आहे. या गॅरेजबाहेर गुलाम रब्बानी याचे पंक्चरचे दुकान आहे. निर्जन असलेल्या या भागात रात्रीच्या सुमारास हल्लेखोर हवा भरण्याच्या उद्देशाने गॅरेजवर आले. यातून वाद होऊन तिघांनी गॅरेज चालकावर हल्ला केला. पोटात आणि छातीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढले सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कमी पडते का असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांनी या गुन्हेगारीची दखल घ्यावी आणि तातडीने आढावा बैठक बोलवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Nashik Crime rate Increase Murder Police