नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेमध्ये टीसी या पदासाठी भरती करुन देतो असे आमिष दाखवून तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगावमधील एकास अटक केली आहे. आरोपीचा कसून शोध सुरू असून याप्रकरणी आणखी बरीच माहिती हाती येण्याची चिन्हे आहेत.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपींनी संगनमत करून यातील फिर्यादी वेतन शिवाजी इथे (रा. नांदगाव, ता. नांदगाव) व इतर साक्षीदार यांचा विश्वास संपादन केला. मध्य रेल्वे विभागात तिकीट तपासणीस (टी.सी.) व गेटमन पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्ती पत्र दिले. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांची वैद्यकीय तपासणी करून बनावट सही व शिक्के असलेले मेडीकल सर्टीफिकेटही दिले. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपये घेतले. तिकीट तपासणीस व गेटमन या पदावर नोकरीस लावून न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली.
यातील फिर्यादी व साक्षीदार हे रेल्वे व इतर भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी यातील आरोपी ज्ञानेश नथू सुर्यवंशी, (रा. पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव) याचे हनुमाननगर नांदगाव येथे असलेल्या सायबर कॅफेवर जात असे. त्यावेळी यातील आरोपी ज्ञानेश सुर्यवंशी याने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशाला भरत आहे, मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीस लावुन देतो, असे सांगुन टी. सी. पदासाठी १५ लाख व गेटमन पदासाठी १२ लाख रुपये लागतील असे सांगितले. सह आरोपी सतिष गुंडू बच्चे (रा. घर नं. ९. सदगुरू हाईटस्, पुणे, ता. जि. पुणे) आणि संतोष शंकरराव पाटील (रा. वंडरसिटी, कात्रज, ता.जि.पुणे) यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर आरोपींनी बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्ती पत्र व सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, मुंबई, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई आणि राणी मुखर्जी हॉस्पिटल, उत्तर रेल्वे दिल्ली या ठिकाणी वैद्यकीय चाचणी झाली. येथे बनावट सही व शिक्के असलेले मेडीकल सर्टीफिकेट देण्यात आले. यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपये घेवून तिकीट तपासणीस व गेटमन या पदावर नोकरीस लावून दिले नाही आणि फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर गाडे, सपोनि श्री. ईश्वर पाटील, पोहवा भारत कांदळकर, पोना अनिल शेरेकर, सुनिल कु-हाडे, सागर कुमावत, पोकों संदिप मुंढे यांचे पथकाने सदर कारवाई केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे..