नाशिक – बाहेरगावचे यजमान पळविल्याच्या कारणातून पौराहित्य करणाऱ्या पुजारींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ संशयीतांना बेड्या ठोकल्या आहेत. तर, त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह अकरा जिवंत काडतुसे सापडली आहेत. कारच्या झडतीत हे आढळून आले आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी अतिशय गांभिर्याने तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विरेंद्र हरिहरप्रसाद त्रिवेदी (५०), आशिष विरेंद्र त्रिवेदी (२६), मनिष विरेंद्र त्रिवेदी (२३), सुनील आदित्यप्रसाद तिवारी, (सर्व रा. मोकळबाबानगर, हिरावाडी), आकाश नारायण त्रिपाठी, (२५),अनिकेत उमेश तिवारी (२२) (द्वारकेश हाइट, केवडीबन), सचिन नागेंद्र पांडे ( रा.केवडीबन तपोवन) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई सागर पांढरे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे पौरोहित्य करण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि.४) नागपूरचे यजमान धार्मिक विधी करण्यासाठी शहरात आले होते. आपले यजमान पळविल्याच्या कारणातून हा वाद झाला. नागपूर येथील नागरीकांच्या पुजे वरून संशयीतांच्या दोन गटात त्र्यंबकेश्वर पुजा सुरू असतांना शाब्दीक चकमक उडाली होती.
सदर नागरीक परतीच्या प्रवासासाठी लागणार असल्याने नाशिक येथे दाखल झाले असता संशयीतांमध्ये महात्मा गांधी रोड भागात वाद झाला. रात्री हिरावाडीतील भिकुसा मिल भागात दोन्ही गट समोरा समोर आल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीसांनी धाव घेत संशयीतांना ताब्यात घेतले असता त्यांच्या वाहनाच्या झडतीत गावठी कट्टा अकरा जीवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे मिळून आले असून सेल्टॉस व इर्टिगा कारसह मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट मार्शल सागर पांढरे आणि पोलीस नाईक सचिन अहिरे आदींनी केली.