नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिण अफ्रिकेतून शिक्षणानिमित्त शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी फ्लॅट शोधून देणाऱ्या दोघा भामट्या ब्रोकरने लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. घरमालकास ठेव म्हणून दिलेल्या रक्कमेचा भामट्यांनी अपहार केल्याने हा प्रकार समोर आला आहे. तसेच, संशयितांनी थेट विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका ब्रोकरला अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. संशयितास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील प्रकाश मुदिराज (३७ रा. संगीत रेसिडेन्सी, गोविंदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर, गणेश पांडूरंग पाटील (२५ रा.योगेश हॉटेल समोर, खुटवडनगर) हा त्याचा साथीदार फरार आहे. याप्रक्रणी मोसेस टोटलीसंग बाबालोला (२१ मूळ रा. सेंडीन टॉन, द.अफ्रिका हल्ली आस्था रेसिडेन्सी, गंगापूररोड) या विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली आहे. बाबालोला याच्यासह डारायस गोल, डेटीमले एबार, डेविड डेमी, बुसी, बरनाडो, लॉरिन व नोबार्ट आदी दक्षिण अफ्रिकेतील विद्यार्थी नाशिक शहरात शिक्षण घेतात.
पुर्वी शिक्षण घेतलेल्या मित्रास संशयितांनी भाडेतत्वावर घर शोधून दिल्याने विद्यार्थ्यांनी मुदिराजशी संपर्क साधला होता. गंगापूररोड भागात फ्लॅट मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गेल्या सप्टेबर महिन्यात संशयितांची शिंगाडा तलाव भागातील त्यांच्या श्रीजी युनिपार्क येथील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी बाबालोला यांनी रोख ४३ हजार व फोन पेच्या माध्यमातून १७ हजार रूपये संशयितांच्या स्वाधिन केले होते. तर उर्वरीत मित्रांनीही अनुक्रमे २५, १०, ५५, ५५, ४२, ३० व ६० हजार रूपये असे ३ लाख ३७ हजार रूपये संशयिताना अदा केले होते. दोघा संशयितांनी सर्व मित्रांना सोमेश्वर भागात भाडेतत्वावर फ्लॅट शोधून दिले. कालांतराने घरमालकांकडून डिपॉझिटची मागणी करण्यात आल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आहे.
विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असता काही दिवस संबधितांनी टोलवाटोलवी केली. मात्र संबधितांनी सोमवारी (दि.२१) बाबालोला याच्याशी संपर्क साधून थेट दोन्ही भावांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला. भेदरलेल्या भावांनी मुंबईनाका पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत एका संशयितास अटक केली असून त्याचा साथीदार पसार झाला आहे. अटक केलेल्या संशयितास न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुनिल रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
Nashik Crime Property Broker Cheating Students
Police South Africa Fraud