नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौळाणे – पाथर्डी मार्गावर भात खराब दिला या कारणातून टोळक्याने हॉटेलमध्ये गोंधळ घातल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने दोन कर्मचा-यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश शिवाजी गवळी (रा. पाथर्डीगाव) व त्याचे चार साथीदार अशी हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रथमेश संदेश देवरे (रा. एकता चौक, उत्तमनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. देवरे यांचे गौळाणे रोडवरील गरजा बिल्डींग शेजारी साई आनंद नावाचे हॉटेल आहे. गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जेवणासाठी आलेल्या संशयितांनी भात खराब दिल्याची कुरापत काढून हॉटेलमध्ये गोंधळ घातला. यावेळी संतप्त टोळक्याने शिवागाळ व दमदाटी करीत देवरे यांच्यासह दुर्गेश इंगळे नामक कामगारास लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत दोघे जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
गंगापूररोडवर सोनसाखळी ओरबाडली
गंगापूररोडवरील ठक्करनगर भागात दुचाकीवरून प्रवास करणा-या वृध्दाच्या गळ्यातील सोनसाखळी भामट्यांनी ओरबाडल्याची घटना घडली. चोरट्यांनी सुमारे ५० हजार रूपये किमतीचे लॉकेट पळविले आहे. याप्रकरणी नंदकिशोर मुरारी जाजू (७५ रा. वसंत मार्केट समोर कॅनडा कॉर्नर) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृध्द जाजू शुक्रवारी (दि.७) दुपारी आपल्या अॅक्टीव्हा एमएच १५ एचएफ ६७१२ वर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. गंगापूररोडने ते आपल्या राहत्या घराकडे जात असतांना पाठीमागून विनानंबर प्लेट असलेल्या दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.