नाशिक – चोरीच्या गुह्यात ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास शिवीगाळ करीत एकाने तुम्हाला कामाला लावतो अशी धमकी देत थेट अंगावर डिझेल ओतून घेत गोंधळ घातल्याची घटना संत कबीर नगर झोपडपट्टीत घडली. या घटनेत कुटूंबियांनीही संशयीतास मदत केल्याचा आरोप पोलीसांनी केला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश भारत कटारीया, त्याचे मित्र व कुटूबियावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या गुह्यात अजय घुले या संशयीतास सातपूर पोलीसांनी जेरबंद केले आहे. संबधीताच्या कबुली जबाबावरून बुधवारी (दि.२२) सकाळी पोलीस पथक संशयीत कटारीया याच्या घरी पोहचले असता ही घटना घडली. कटारीया, त्याचे मित्र आणि कुटूंबियांनी जोरजोरात आडराओरड करीत कारवाईस विरोध केला. पोलीसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त कटारीया यांने पथकास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत तुम्हाला कामाला लावतो अशी धमकी देत ज्वलनशिल डिझेलची कॅन अंगावर ओतून घेतली. पोलीसांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असून डिझेल कॅनही जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
पाय घसरुन पडल्याने वृध्देचा मृत्यू
नाशिक – राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ७० वर्षीय वृध्देचा मृत्यु झाला. ही घटना औरंगाबाद रोड वरील निलगीरी बाग भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
जानकाबाई किसन पटेकर (रा.बिडीकामगारनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. पटेकर या बुधवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या. कुटूबियांनी त्यांना तात्काळ मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.