नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नाशिक पोलिसांच्या मोठ्या यशाची माहिती दिली आहे. खूनाच्या गुह्यात तब्बल वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सराईतासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, त्यांच्या अटकेने सिडको आणि सातपूर मधील १४ घरफोड्यांची उकल झाली आहे. या कारवाईत कार, दोन मोटारसायकलीसह सोने असा सुमारे २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. या त्रिकुटाचे अजून काही साथिदार असल्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेवून संबधीतावर मोक्कान्वये कारवाई करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याचेही नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.
आयुक्त नाईकनवरे म्हणाले की. अभिषेक उध्दव विश्वकर्मा (२१),करण अण्णा कडूसकर(२३) व ऋषिकेश अशोक राजगिरे (२१ रा.सर्व अंबड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या वर्षी चुंचाळे शिवारात झालेल्या खूनाच्या गुह्यातील तीघे संशयित आरोपी असून विश्वकर्मा हा भावजयीच्या प्रियकराची हत्या करून पसारा झाला होता. अंबड औद्योगीक वसाहतीसह सिडको भागात घरफोड्या वाढल्याने अंबड पोलिस कामाला लागले होते.
गेल्या महिन्यात वरिष्ठ निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक औद्योगीक वसाहतीतील एका कंपनीत झालेल्या चोरीचा शोध घेत असतांना विश्वकर्माचा समावेश असल्याचे समोर आल्याने पोलिस सतर्क झाले होते. पोलिसांनी खबºयांच्या माध्यमातून कडूसकर यास चुंचाळे शिवारात बेड्या ठोकल्या असता विश्वकर्मा चाकण (पुणे) येथे तर राजगिरे जिह्यातील पेठ येथे असल्याची माहिती हाती लागली होती. पोलिसांनी माहितीच्या आधारे पुणे व पेठ गाठून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी अंबड हद्दीत तेरा तर सातपूर मध्ये एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
संशयितांच्या ताब्यातून चोरीच ओमनी कार,दोन मोटारसायकली,लॅपटॉप आणि २८ तोळे वजनाचे सोने असा सुमारे २० लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तिनही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द खून, लुटमार,जबरीचोरी,घरफोड्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वयापेक्षाही जास्त गुन्हे त्यांच्यावर असून त्यात अंबड,इंदिरानगर,लासलगाव,गंगाखेड व उस्मानाबादचा समावेश आहे.