नाशिक – गेल्या काही दिवसात नाशकात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. नाशिक पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला आहे की नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरात घडलेल्या दोन घटनांनी तर गुन्हेगारांनी थेट नाशिक पोलिसांनाच आव्हान दिल्याने दिसून येत आहे. एका घटनेत कारचालकाला बेदम मारहाण करुन त्याच्याकडील सव्वा पाच लाखांची रोकड लांबवली आहे. तर, दुसऱ्या घटनेत सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकाकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. आता या दोन्ही प्रकरणात नाशिक पोलिस काय तपास करतात आणि गुन्हेगारांना जेरबंद करतात का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
कारचालकाला मारहाण करुन पाच लाख लांबवले
नाशिक – कारचालकास बेदम मारहाण करीत टोळक्याने सव्वा पाच लाखा रूपयांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना अशोकामार्ग परिसरात घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल, अमिर आणि अन्य दोन जण अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी धिरज प्रशांत हिरण (२८ रा.बालाजी अपा.हॅपी होम कॉलनी,अशोका मार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. हिरण शुक्रवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास एमएच १५ एफसी ९८८१ या कारमधून आपल्या घराकडे जात असताना ही घटना घडली. अशोकामार्गावरील रामेश्वर अपार्टमेंट समोर पाठीमागून आलेल्या दुचाकींस्वारांनी त्यांना अडविले.
आमच्या गाडीला कट का मारला असा जाब विचारत संशयीतांनी शिवीगाळ करीत थेट हिरण यांना वाहनाबाहेर खेचून मारहाण केली. याप्रसंगी फोन वरून अन्य दोघांना बोलावून घेत टोळक्याने कारचे नुकसान केले. या हाणामारीत टोळक्याने कारच्या ड्रावर मध्ये ठेवलेली सव्वा पाच लाख रूपयांची रोकड लांबविली असून, पाळत ठेवून टोळक्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
उद्योजकाकडे २ कोटींची खंडणी मागितली
नाशिक – जागा खाली करण्यासाठी कुख्यात गुंड रम्मी राजपूत याचा धाक दाखवित दोघांनी उद्योजकाकडे दोन कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रूपेश धीरवाणी (४०) व मोहनलाल पहुजा (४०) अशी संशयीत खंडणीखोरांची नावे आहेत. या प्रकरणी ईश्वर शामची लापसीया (रा.सावरकरनग) यांनी तक्रार दाखल केली आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील प्लॉट नंबर ६८- ४ येथे लापसीया यांची कंपनी आहे. लापसिया काम करीत असलेल्या कारखान्याच्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत संशयीतांकडून या जागेवरील कब्जा सोडविण्यासाठी लापसिया व त्यांचे मालक सुरेश शहा यांना धमकाविले जात आहे. गेल्या महिना भरापासून संशयीताकडून संपर्क साधला जात असून, ते भूमाफिया रम्मी राजपूत याचे नाव सांगून जीवे मारण्याची धमकी देवून मांडवली पोटी दोन कोटी रूपयांची मागणी करीत आहेत. अधिक तपास निरीक्षक सतिष घोटेकर करीत आहेत.