नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तडीपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणाऱ्या दोन तडिपारांना वेगवेगळ्या भागात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने पुन्हा एकदा तडिपारांचा वावर चर्चेत आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक उर्फ डेमो भाऊसाहेब जाधव (२२ रा. हनुमंतनगर,लोखंडेमळा जेलरोड) व अजय प्रविण दहेकर (२१ रा.शांतीविलास अपा.आनंदनगर,पाथर्डी शिवार) अशी अटक केलेल्या हद्दपार गुंडाची नावे आहेत. शहरात हद्दपार गुंडाचा उपद्रव वाढल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. संशयितांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई करूनही पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते राजरोसपणे शहरात वावर ठेवत असल्याने पोलिसांकडून विशेष शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ चे हवालदार सुगन साबरे व चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी (दि.७) दोघा संशयितांना वेगवेगळ्या भागात बेड्या ठोकण्यात आल्या. जाधव हा लोखंडे मळा भागातील त्याच्या घर परिसरात मिळून आला असून, सराईत गुन्हेगार अजय दहेकर हा पाथर्डी शिवारातील हॉटेल गारवा भागात आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार प्रकाश भालेराव,सुगन साबरे,राजेंद्र घुमरे,शंकर काळे,प्रकाश बोडके,चंद्रकांत गवळी,नंदकुमार नांदूर्डीकर,प्रशांत वालझाडे आदींच्या पथकाने केली.
Nashik Crime Police Arrest 2 Suspect Tadipar