नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळेच विविध प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शहरात खुनसत्रही सुरूच आहे. विशेष म्हणजे, ही गुन्हेगारी रोखण्यात नाशिक पोलिसांचे प्रयत्न कमी पडत आहेत की काय, अशी भावना नाशिककरांची झाली आहे. आज दुपारच्या सुमारास पंचवटी परिसरात एक गंभीर घटना घडली आहे.
औरंगाबाद नाक्या जवळील विजय नगर कॉलनीतील देवी मंदिरावजवळ एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दीपक काशिनाथ डावरे (वय 22) या युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दीपक हा मैदानात क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी सदाशिव झाबरे व त्याच्यासोबत काही तरूण मैदानावर आले. त्यांनी धारदार शस्त्राने दीपकवर हल्ला केला. या हल्ल्यात दीपक डावरे याचा पोटातील कोथळा बाहेर आला आहे. दीपकची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
भर दिवसा अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला झाल्यामुळे मैदानावर मोठा गोंधळ उडाला. तेथे असलेले अनेक जणांनी पळ काढला. तर, काही जणांनी तातडीने पोलिसांना कळविले. परिसरात मात्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी त्वरीत कठोर पावले उचलावी, अशी आग्रही मागणी नाशिककरांकडून होत आहे.