नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशकात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज हत्येची एक घटना समोर येत आहे. नाशिक पोलिस हाताची घडी ठेवून बसले आहेत की काय, असा प्रश्न नाशिककरांना सतावत आहेत. त्यातच पंचवटीतील हत्ये झालेल्या युवकाची ओळख पटली आहे. हा युवक सातपूरचा आहे. त्याचे नाव ऋषिकेश दिनकर भालेराव असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
पंचवटीतील मखमलाबाद लिंक रोडवर तुळजाभवानी नगर येथील हमाल वाडीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांना एक मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून या युवकाचा खुन करण्यात आला होता. खुन झालेल्या व्यक्तीची ओळख पटू नये म्हणून आरोपीने युवकाचा चेहरा व डोके दगडाने ठेचले होते. मात्र, मृत युवकाची ओळख पटली आहे. ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर, नाशिक) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डाॅ सीताराम काेल्हे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) युवराज पत्की आदीसह गुन्हेशाखा युनिट एक, दाेन तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे आधिकारी दाखल झाले. पाेलिसांनी पाहणी करुन पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस तपास सुरू असताना सर्व पोलीस ठाण्यातील मनुष्य मिसिंगच्या नोंदींचा तपास केला असता ऋषिकेश भालेराव हा बेपत्ता असल्याचे शनिवारी रात्री उशिरा आढळून आले. पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेह दाखविला. तेव्हा मृतदेहाची ओळख पटली असुन आता खुन्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे कायम आहे.
सातपूर येथील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून ऋषिकेश कामाला होता. कामातही त्याचे जास्त लक्ष नव्हते. त्याला विविध प्रकारची नशा करण्याचे व्यसन जडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याची पार्श्वभूमी सामान्य असल्याचे समोर येते आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांना मृत ऋषिकेशची ओळख पटल्याने त्याची हत्या कुणी व का केली असेल, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. याचा तपास आता सुरू झाला आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित ओळखीचे तसेच अन्य संशयितांची चौकशी सुरू असून सातपूर ते पंचवटी असा मोठ्या परिसरात मयत ऋषिकेश फिरला असल्याने पोलिसांपुढे संशयितांचा माग काढणे मोठे जिकरीचे झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) युवराज पत्की करीत आहे.
Nashik Crime Panchavati Murder Youth Identified
Police Investigation