नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया-युक्रेन युद्ध आणि जगभरात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे खाद्यतेलाच्या दरांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच १४० ते १५० रुपये प्रति लिटर असलेले तेल आता थेट १७० ते १८० रुपयांवर गेले आहे. तेल भाव खात असल्याने त्याची दखल आता चोरट्यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी आपला मोर्चा आता खाद्य तेलाकडे वळविला आहे. पंचवटीत होलसेल दुकान फोडून चोरट्यांनी चक्क हजारो रुपयांचे तेल लंपास केले आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडीत चोरट्यांनी होलसेल किराणाचे दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. महेश गोविंदजी ठक्कर (वय ५३, गंगोत्री बंगला, ओमनगर हिरावाडी) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठक्कर यांचे हिरावाडी शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील गाळ्यात श्रीराम ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. गुरुवारी रात्रीतून कधी तरी चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूच्या बाथरुमच्या खिडकीला लोखंडी गचाने वाकवून खिडकीवाटे बाथरुममध्ये प्रवेश केला तेथून बाथरुमचा लाकडी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश करीत, दुकानात १५ किलोच १८ तेलाचे डबे, तेलाच्या १० पिशव्याचा एक याप्रमाणे ए ४४ बॉक्स १२ पिशव्या सुमारे १ लाखांहून आधीकचे तेलांची चोरी केली.