नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये एचएएलचे बनावट ओळखपत्र बनवून फिरणाऱ्या दोन जणांविरुध्द ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या आणि लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या एचएएलच्या हेरगिरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
एचएएल सुरक्षा विभागाचे सिनियर मॅनेजर बबनराव मारुती पोटे यांनी ओझर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे की, आरोपी मनोज पटेल उर्फ अबू हसन सलीम पठाण (वय वर्ष ३७, रा. सारडा सर्कल) आणि हर्षल रमेश भानुशाली (रा. विक्रमगड, जि. पालघर) यांनी स्वतःचे बनावट एचएएल कंपनीचे ओळखपत्र बनविले. आम्ही एचएएल कंपनी ओझर नाशिकचे अधिकारी आहोत असे भासवून तोतयेगिरी केली. तसेच, स्वतःच्या फायद्यासाठी एचएएल कंपनीचे ओळखपत्र बनावटीकरण केले. त्यानंतर कंपनीच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुरक्षेत बाधा पोहोचेल असे कृत्य केले. या तक्रारीनंतर ठकबाजीचा गुन्हा ओझर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी सांगितले आहे.