नाशिक – कोयत्याने प्राणघातक हल्ला करून पसार झालेला हल्लेखोर वर्षभरांनंतर पोलीसांच्या हाती लागला आहे. मुक्तीधाम परिसरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. संशयितास उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली आहे.
रोहन राठोड उर्फ पियुष शैलेंद्र खोडे (रा.रोशनी अपा., जयभवानीरोड) असे अटक केलेल्या फरार संशयीताचे नाव आहे. २१ जुलै रोजी जयभवानीरोडवरील माणिकनगर येथे घरगुती कारणातून कुणाल रामदास पोकळे या युवकावर प्राणघातक हल्ला झाला होता. संतप्त टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी भाऊ विशाल पोकळे याच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्याचा जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तीन जणांना पोलीसांनी बेड्या ठोकत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. मात्र संशयीत एक वर्षापासून गुंगारा देत होता.
पोलीस त्याच्या मागावर असतांना शनिवारी (दि.१८) युनिटचे हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मक्तीधाम पाठीमागील कदम लॉन्स परिसरात संशयीत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ,हवालदार प्रकाश भालेराव,अनिल मोंढे,सुगन साबरे,शंकर काळे,देवकिसन गायकर आदींच्या पथकाने केली.