नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घर तारण गहाण प्रकरणात एकास दहा लाख रूपयाना गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रक्कम स्विकारूनही घराचा ताबा न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इफ्तेकार अन्सारी (४३ रा.मुंबई) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे.
याबाबत मुस्ताक भिकन पिंजारी (रा.मुमताजनगर,वडाळागाव) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित अन्सारी याच्या तैबानगर येथील मदार अपार्टमेंटमध्ये दोन सदनिका आहेत. या सदनिका पिंजारी यांना भाडे तत्वावर पाहिजे होत्या. त्यामुळे त्यांनी मुंबईस्थित संशयिताशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने सदर सदनिका तारण गहाण द्यायच्या असल्याचे सांगितल्याने एप्रिल २०२४ मध्ये दोघांमध्ये रक्कम निश्चित झाली. पिंजारी यांनी जमवाजमव करून दहा लाखाची रक्कम संशयिताच्या स्वाधिन केली.
मात्र सहा महिने उलटूनही दोन्ही सदनिकांचा ताबा न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.