नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुन्या वादातून एकाने तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना मोठा राजवाडा भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल उर्फ भावड्या शेखर साबळे (रा.मोठा राजवाडा,जुने नाशिक) असे तरूणाच्या डोक्यात बाटली फोडणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत गणेश हिरामण तोरे (३७ रा.कृष्णा प्राईड सदाशिवनगर पाथर्डी फाटा) या युवकाने फिर्याद दिली आहे. तोरे गेल्या गुरूवारी (दि.२१) मोठा राजवाडा भागात गेला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून तो रस्त्याने पायी जात असतांना संशयिताने त्याची वाट अडवित जुन्या भांडणाची कुरापत काढली. यावेळी संतप्त संशयिताने तोरे याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने तो जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.