नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लग्नाचे आमिष दाखवत एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने संशयिताने आईस जीवे ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे.
अल्ताफ राजू शेख (२४ रा.नेहा अपा. गुलमोहर कॉलनी शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित रिक्षाचालक एकमेकांचे परिचीत असून गेल्या जानेवारी महिन्यात संशयिताने मुलीस गाठून रिक्षातून आपल्या घरी नेले. यानंतर संशयिताने माझे तुझ्यावर प्रेम असून लग्नाचे आमिष दाखवित मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने याबाबत वाच्यता केल्यास आईस जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यानंतरही संशयिताने मुलीस वेळोवेळी घरी नेवून आपले इप्सित साध्य केल्याने ती गर्भवती राहिली. मुलीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने जातीवाचक शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पुनम पाटील करीत आहेत.