नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील एका वन लाईफ सोसायटीत घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. आदिती बागुल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत चोरट्यांनी उघड्या घरात शिरून ही चोरी केली. घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ७ लाख २५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.
जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने तीघांवर केला प्राणघातक हल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने तीघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना चेहडी पंपीग भागात घडली. या घटनेत धारदार चॉपरने वार करण्यात आल्याने तीन तरूण जखमी झाले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतिक अडसुरे, संदिप माळी, चैतन्य गवारे व योगेश लोंढे (रा. सर्व चेहडी पंपीग नाशिकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत जगदिश दादासाहेब पवार (१७ रा.श्रमिकनगर,चेहडी बु.) या मुलाने फिर्याद दिली आहे. पवार बुधवारी (दि.२७) रात्री दहाच्या सुमारास चेहडी पंपीग येथील हनुमान चौकात आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने पवार यास गाठून तू मंगेश नामक मित्रास का शिवागीळ केली असा जाब विचारत मागील भांडणाचा राग मनात धरून जगदिश पवार व त्याचा आतेभाऊ सुनिल हिरे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्यातील एकाने पवार याच्यावर धारदार चॉपरने वार केले. याप्रसंगी पवार याच्या बचावासाठी दिपक बोराडे व यश धोंगडे या दोघा मित्रांनी धाव घेतली असता त्यांच्यावरही चॉपरने वार करण्यात आले. या घटनेत तीघे मित्र जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.