नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सोशल मिडीयावर फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी प्रेमाच्या जाळयात अडकवत महिलेस तब्बल सव्वा सोळा लाख रूपयांना गंडा घातला आहे. स्व:ताचा अपघात झाल्याचे भासवून तसेच मुलीच्या अॅडमिशनच्या नावाखाली भामट्याने ऑनलाईन पैसे उकळल्याचा आरोप महिलेने केला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड भागातील ३५ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या मे महिन्यास फेसबुक या सोशल साईडवर महिलेला सायबर भामट्याने फेण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. महिलेने संशयिताची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्याने ही फसवणुक झाली. नियमीत ऑनलाईन चॅटींगच्या माध्यमातून दोघांमध्ये संभाषण होवू लागल्याने अल्पावधीत त्यांची मैत्री झाली. याकाळात एकमेकांचा विश्वास संपादन करण्यात आल्याने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
अवघ्या तीन महिन्यात फेसबुकसह व्हॉटसअपच्या माध्यमातून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र मासा गळाला लागल्याचे लक्षात येताच संशयिताने वेगवेगळे बहाणे केले. स्व:ताचा अपघात झाल्याचे भासवून तसेच मुलीच्या होस्टेलची फी भरावयाची असल्याचे सांगून भामट्याने महिलेस वेगवेगळया बॅक व वॉलेट खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. या प्रकरणात महिलेची तब्बल १६ लाख ३५ हजार रूपयांची फसवणुक करण्यात आली असून संशयिताचा संपर्क तुटल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे.