नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून टेहळणी करून बंद घरे फोडली जात आहेत. रविवारी (दि.२४) वेगवेगळया भागातील तीन घरे चोरट्यांनी फोडली. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला असून, याप्रकरणी सातपूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घरफोडीची पहिली तक्रार ऋषीकेश शिवाजी बोरसे (रा.मोहित अपा.सार्थक हॉस्पिटल जवळ मौले हॉल शिवकॉलनी) यांनी दिली आहे. बोरसे कुटूंबिय रविवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बोरसे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ड्रावरमध्ये ठेवलेली ९४ हजाराची रोकड व सोन्याचादीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७३ हजार ८५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.
दुसरी घटना गोरेवाडी भागात घडली. चंद्रकला अनिल आहिरे (रा.लीला रो हाऊस शेजारी शास्त्रीनगर रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहिरे व बुध्द विहार परिसरात राहणा-या वैशाली लक्ष्मण गोतरणे यांची घरे चोरट्यांनी रविवारी रात्री फोडले. दोन्ही बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ४८ हजार १३० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.