नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील महिला मुली परचितांकडूनच असुरक्षीत असल्याचे वास्तव आहे. चुंचाळे शिवारात एकीवर ३१ वर्षीय परचिताने वेळोवेळी बलात्कार केला. गर्भवती मुलीची प्रसूती झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. तर घरासमोर खेळणा-या दुसरीला शेजा-याने पार्किममध्ये ओढत नेवून विनयभंग केला. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार,विनयभंग व पोस्को कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे शिवारातील घरकुल भागात राहणा-या राजेश पुंडलीक पवार (३१) याने परिसरातील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत तिच्याशी मैत्री असल्याचे भासवून वेळोवेळी बलात्कार केला. आपल्या घरी बोलावून घेत संशयिताने हे कृत्य केले. वर्षभर हा प्रकार सुरू राहिल्याने मुलगी गर्भवती राहून तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली आहे.
दुसरी घटना याच भागातील जाधव संकुल परिसरात घडली. शुक्रवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घरासमोर आपल्या भावंडासमवेत खेळणा-या अल्पवयीन मुलीस हरिश्चंद्र लालमुनी कुंभार (३० रा.रो हाऊस नं.२, प्लॉट नं.५ जाधव संकुल चुंचाळे शिवार) याने आवाज देवून बोलावून घेत इमारतीच्या पार्किंगमध्ये ओढत नेले. या ठिकाणी संशयिताने तिचा विनयभंग केला. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार,विनयभंग व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे व लाड करीत आहेत.