नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकी अडवून चाकूचा वार करीत दोघांनी हॉटेल व्यावसायीकाचा मोबाईल लांबविल्याचा प्रकार भाभानगर येथे घडला. या घटनेत पैश्यांची बॅग ओढतांना व्यावसायीकाने प्रतिकार केल्याने भामट्यांनी ५० हजाराच्या मोबाईलवर समाधान मानत पोबारा केला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत मनोहर कुलकर्णी (५६ रा.भाभानगर,मुंबईनाका) यांनी फिर्याद दिली आहे. कुलकर्णी यांचा हॉटेल व्यवसाय असून गुरूवारी (दि.२१) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते एमजी रोड भागातील हॉटेल वाढवून नेहमीप्रमाणे दुचाकीवर घराकडे जात असतांना ही घटना घडली. भाभानगर येथील मेडप्लस मेडिकल जवळ
पाठीमागून मोपेड दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांची वाट अडवित ही लुटमार केली. कुलकर्णी यांच्या दुचाकीस लाथ मारून त्यांना खाली पाडले. यावेळी भामट्यांनी त्यांच्या गळयात अडकवलेली दिवसभराच्या व्यवसायाची रक्कम असलेली बॅग ओढण्याचा प्रयत्न केला.
मात्र कुलकर्णी यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्याशी दोन हात केला असता संतप्त दोघांनी कुलकर्णी यांच्या दोन्ही हातावर धारदार चाकूने वार करीत त्यांच्या खिशातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.