नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिलेव्हरी बॉयने डिटर्जंट मालाची चोरी करून परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत चोरीची तब्बल सव्वा पाच लाख रूपये किमतीची साबण व पावडर आणि बॉडीलोषणची परस्पर विक्री करण्यात आली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार तेजस यशवंत तायडे (रा.मधुबन कॉलनी,मखमलाबादनाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत शंकर नंदलाल वलेचा (रा.जिपीओ शेजारी त्र्यंबकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. वलेचा यांची डिटर्जंट आणि कॉस्मेटीकची वस्तू विक्रीची एजन्सी असून संशयित त्यांच्याकडे डिलेव्हरी कर्मचारी म्हणून नेमणुकीस आहे. शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील शॉप नं.४९ येथे गोडावून आहे.
या गोडावून मधून संशयिताने २० जुलै ते २५ ऑगष्ट दरम्यान मालकास न सांगता सरगम कंपनीच्या साबणाचे ११८ बॉक्स व याच कंपनीची ७२४ गोणी पावडर आणि लिबोलिया कंपनीचे बॉडीलोशन असा सुमारे ५ लाख २८ हजार ३०० रूपये किमतीचा माल चोरून नेत त्याची परस्पर विक्री केली व रकमेचा अपहार केला. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.