नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीसह चोरट्यांनी पान दुकान फोडल्याचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव, मुंबईनाका, अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घरफोडीची फिर्याद वर्षा महेश सोनवणे (रा.ओमकार रो हाऊस राजलक्ष्मी कॉलनी,कोनार्क नगर) यांनी दिली आहे. सोनवणे कुटुंबिय गेल्या गुरूवारी (दि.२१) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बहिरम करीत आहेत. दुसरी घटना चांडक सर्कल भागात घडली. याबाबत मंगला माणिकराव पवार (रा.आदित्य अव्हेन्यू,चांडक सर्कल जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबिय गेल्या ६ ते २१ आॅगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून देवघरातील सुमारे ४५ हजार ५०० रूपये किमतीचे चांदीचे देव व भांडी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील वावरे नगर भागात घडली. याबाबत भिमाबाई रोहिदास मुसळे (रा.मुसळे चाळ, विठ्ठलनगर अंबड लिंकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (दि.२१) भरदिवसा ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मुसळे यांच्या उघड्या घरात शिरून बेडरूममधील कपाटात ठेवलेले साडे दहा हजार रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ३८ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.
चौथी घटना नारायण बापू चौकात घडली. संदिप गणपत ठाकुर (रा.प्रगतीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ठाकुर यांचे नारायण बापू चौकातील गजानन गॅलेक्सी येथील शॉप नं. १ मध्ये पानशॉप आहे. गेल्या सोमवारी (दि.१८) रात्री अज्ञात चोरट्यांनी पान दुकानाचे शटर वाकवून गल्यातील रोकड व महागडी सिगारेट पाकिटे असा सुमारे ४७ हजार ९०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.